जागा मिळाली, प्रस्तावही झाला; सानगडी पोलिस चौकी मात्र ४९ वर्षांपासून भाड्याच्या खोलीतच!
१७ गावांतील ३० हजार नागरिकांची सुरक्षा मोजक्या कर्मचाऱ्यांवर
एक हेक्टर जागा कागदावर, इमारत बांधकामाचा पत्ता नाही
नाजीम पाशाभाई
साकोली : साकोली पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सानगडी पोलिस चौकीची स्थापना २ जून १९७७ रोजी झाली. तब्बल ४९ वर्षे उलटूनही चौकीला स्वतःची इमारत मिळालेली नाही. १९८५-८६ मध्ये सानगडी येथील गट क्रमांक ४५५/२ मध्ये सुमारे एक हेक्टर जागा जिल्हा पोलिस अधीक्षक, भंडारा यांच्या नावे निश्चित करण्यात आली. तरीही या जागेवर इमारत उभी राहिली नाही. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे चौकीतील नियमित उपस्थिती कमी झाल्याने १७ गावांतील नागरिकांना तक्रारींसाठी सुमारे १५ किलोमीटर दूर साकोली गाठावे लागत आहे. त्यामुळे चौकीची इमारत, पोलिसांची २४ तास उपस्थिती आणि सानगडीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा या मागण्या पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.
प्रस्ताव तयार, पाहणीही झाली; बांधकाम मात्र कागदावरच
चौकीच्या इमारतीसाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. सुरेश कुमार मेकला यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी ९ एप्रिल २००५ रोजी सानगडी येथे भेट देऊन प्रस्तावित जागेची पाहणी केली होती. आवश्यक कागदपत्रे तयार करून प्रस्ताव संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी इमारतीसाठी ८० लाख रुपये मंजूर झाल्याची चर्चा होती. मात्र, या निधीबाबतची अधिकृत स्थिती आणि पुढील कार्यवाही स्पष्ट झालेली नाही. निधी मंजूर झाला असेल तर प्रत्यक्ष बांधकाम का झाले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
१७ गावांचा कारभार, मनुष्यबळ मात्र अपुरे
सानगडी चौकीच्या कार्यक्षेत्रात सानगडी, सासरा, कटंगधरा, सानगाव, मिरेगाव, सोनमाळा, न्याहारवानी, वटेटेकर, शिवनीबांध, झाडगाव, पापडा खुर्द, खंडाळा, साखरा, बोंडे, विहीरगाव बुराड्या, सिरेगावटोला आणि केसलवाडा या १७ गावांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ३० हजार नागरिकांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी चौकीवर आहे. सध्या येथे एक पोलिस उपनिरीक्षक, एक पोलिस हेड कॉन्स्टेबल आणि दोन पोलिस नायक कार्यरत असल्याची माहिती आहे.
राखीव जागेवर अतिक्रमणाचा धोका
पोलिस चौकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या एक हेक्टर जागेच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जागेवर पोलिस चौकीचा मालकी हक्क दर्शविणारे फलक लावण्यात आले होते; मात्र अलीकडे तेही गायब झाले आहेत. या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे जागेचे तातडीने सीमांकन करून संरक्षण करणे आवश्यक आहे.
तक्रार करायची तर साकोलीला जा!
पूर्वी सानगडी चौकीत २४ तास पोलिस कर्मचारी तैनात असायचे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तक्रार नोंदविणे, कायदेविषयक मार्गदर्शन घेणे किंवा एखाद्या घटनेची माहिती देणे सोयीचे होते. मात्र, अलीकडे मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण पुढे करून चौकीतील कर्मचारी साकोली येथे कार्यरत असल्याचे सांगितले जाते.
सानगडी ते साकोली अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. त्यामुळे चौकीच्या कार्यक्षेत्रातील १७ गावांतील नागरिकांना तक्रार किंवा पोलिसांशी संबंधित कामासाठी साकोलीला जावे लागत आहे. यात वेळ, पैसा आणि श्रम खर्च होत असून नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागते. विशेषतः रात्री चोरी, भांडण किंवा अन्य घटना घडल्यास तातडीने पोलिस मदत मिळणार कशी, हा प्रश्न आहे. थंडी, पाऊस किंवा रात्रीच्या वेळी घडलेल्या घटनेत नागरिकांनी नेमके कुठे धाव घ्यायची, असा सवाल उपस्थित होत आहे.
सानगडीला स्वतंत्र पोलिस ठाणे कधी?
व्यापार, शिक्षण, दळणवळण आणि वाढती लोकसंख्या यामुळे सानगडी परिसराचे महत्त्व वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याचे ठिकाण असलेल्या सानगडी चौकीच्या कार्यक्षेत्रात १७ गावे येतात. त्यामुळे चौकीचा विस्तार करून स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. लगतच्या पोलिस चौक्यांच्या दर्जाबाबत निर्णय होऊ शकतो, तर सानगडीचा प्रश्न का प्रलंबित आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सानगडीचा आवाज शासनदरबारी पोहोचत नाही का?
स्वतंत्र पोलिस ठाणे, सुसज्ज पोलिस चौकीची इमारत आणि पुरेसे पोलिस मनुष्यबळ यासाठी वर्षानुवर्षे मागणी होत आहे. मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील पाठपुरावा आणि स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. ४९ वर्षांपासून भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या चौकीला अखेर स्वतःची इमारत कधी मिळणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी
पोलिस चौकीसाठी निश्चित असलेल्या एक हेक्टर जागेचे सीमांकन व संरक्षण करावे, इमारतीच्या प्रस्तावाची सद्यस्थिती स्पष्ट करून बांधकामास तातडीने मंजुरी द्यावी, पुरेसे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून चौकीत २४ तास कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच १७ गावांची व्याप्ती आणि सुमारे ३० हजार नागरिकांची गरज लक्षात घेऊन सानगडीला स्वतंत्र पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.