भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : उमरेड-कºहांडला वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या बासोरा-बोरगाव-वेलतूर कालवा मार्गावर वाघाच्या हल्ल्यात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अमित भीमराव राऊत असे मृत युवकाचे नाव असून, तो बासोरा येथील रहिवासी होता. अवघ्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या घटनेमुळे बासोरा आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित राऊत हा अन्य चार मजुरांसह वेलतूर येथे बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम करण्यासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर पाचही जण दोन दुचाकींवरून गावाकडे परतत होते.
सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास ते गरडा-बासोराकालवा मार्गावरून जात असताना त्यांना रस्त्यावर अचानक दोन वाघ दिसले. अचानक वाघ दिसल्याने मजुरांमध्ये घबराहट पसरली. घाईगडबडीत दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी वाहने सोडून सुरक्षितठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला. याच वेळी अमितचा पाय घसरल्याने तो खाली पडला. जीव वाचविण्यासाठी त्याने जवळच्या झुडपांत आणि वनविभागाच्या नालीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी वाघाने त्याच्यावर झडप घातली. वाघाने त्याच्या मानेवर हल्ला केल्याने अमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले अन्य चार मजूर या हल्ल्यातून बचावले. घटनेची माहिती गावात पोहोचल्यानंतर बासोरा आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ४०० ते ५०० नागरिक घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता वाघाने त्याला खाल्ले नसून मानेवर हल्ला केल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून आले.