अवैध दारूविक्रीवर तुमसर पोलिसांचा छापा

इलेक्ट्रिक मोपेडसह मद्यसाठा हस्तगत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

तुमसर : अवैध दारूविक्री विरोधात कारवाई करत तुमसर पोलिसांनी मेहगाव शिवारात छापा टाकून ८६ हजार ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत विविध ब्रँड्सच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आणि ८० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोपेड जप्त करण्यात आली. याप्रकरणी गौरव विलास मेरुगवार (वय ३०, रा. वार्ड क्रमांक १, अड्याळ, ता. जि. भंडारा; सध्या रा. विनोबा नगर, तुमसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई बळ्ढे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मेहगाव शिवारात छापेमारी करण्यात आली. यावेळी संशयित आरोपी गौरव मेरुगवार याच्याकडून विविध प्रकारच्या मद्याचा साठा आणि चेतक कंपनीची काळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोपेड (क्रमांक एमएच ३६ एटी २६४८) आढळून आली.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात रॉयल चॅलेंज क्लासिक प्रिमियम व्हिस्कीचे ५ पव्हे (१,२५० रुपये), आयकॉनिक व्हाइट फाइनेस्ट इंटरनॅशनल व्हिस्कीचे ६ पव्हे (१,३८० रुपये), रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीचे १२ पव्हे (३,००० रुपये) आणि अल्फा बुल रम १०६ चे ५ पव्हे (७६० रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय ८० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोपेड जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८६ हजार ३८२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५७/२०२६ अन्वेय महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ७७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फठाणे, पोलीस शिपाई बळ्ढे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *