मृत्यू आत्महत्या की घातपात?
परिसरात चर्चांना उधाण; शवविच्छेदन अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार
भंडारा पत्रिका/वार्ताहर
गर्ढा-बघेडा : तुमसर तालुक्यातील पवणारखारी गावाालगतच्या जंगल परिसरात २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ऋतिक विनोद उईके (वय अंदाजे २७, रा. पवणारखा- री) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी अंदाजे १ ते १.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवणारखारी गावाजवळील जंगल परिसरणात तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत काही नागरिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. माहिती मिळताच गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार अभिजीत पाटील तसेच पोलीस बीट रक्षक खोब्रागडे यांनी घटनास्थ्र धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक तपासाची कार्यवाही सुरू केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमक कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, मृत तरुणाच्या पार्श्वभूमी तसेच घटनेपूर्वीच्या हालचालींची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समजते.
आत्महत्या की घातपात? प्रश्न अनुत्तरित तरुणाचा मृतदेह जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याने आत्महत्या केली असण्याची, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात असली तरी मृत्यूमागे अन्य काही कारण आहे का, याबाबतही परिसरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही घटना आत्महत्या आहे की घातपात, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, पोलिसांकडून अधिकृतरीत्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. केवळ घटनास्थळावरील परिस्थितीवरून मृत्यूचे कारण निश्चित करता येणार नसल्याने शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या सखोल तपासातूनच या घटनेमागील वस्तुस्थिती समोर येणार आहे.
निष्पक्ष तपासाची नागरिकांची मागणी या घटनेमुळे पवणारखारी परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कोणत्याही दबावाखाली न येता निष्पक्ष आणि सखोल तपास करावा, घटनास्थळावरील परिस्थितीची बारकाईने पडताळणी करावी आणि मृत्यूमागील नेमके कारण जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, गोबरवाही पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने करतात, तसेच शवविच्छेदन अहवालात काय निष्पन्न होते, याकडे पवणारखारिसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.