भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : अवघ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन किलो वजनाच्या बाळकाला जन्म दिल्यानंतर प्रसूवीनंतर तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) भंडारा येथे घडली. प्रसूवीनंतर प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधून रोजगाराच्या शोधत आलेले एक कुटुंब नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली येथे वास्तव्यास होते. या कुटुंबातील अल्पवयीन मुलीची त्याच परिसरात राहणाऱ्या कार्तिक अर्जुन कुरवे (२१), रा. अरोली, जि. नागपूर याच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याची माहिती आहे.
सोमवारी अल्पवयीन मुलीला प्रसूतीच्या कव्या सुरू झाल्यानंतर तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आरोपी तरुण तिच्यासोबत असण्याची माहिती आहे. मंगळवारी तिची प्रसूती झाली आणि तिने तीन किलो वजनाच्या बाळकाला जन्म दिला. नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, प्रसूवीनंतर अल्पवयीन मातेची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, प्रसूती सामान्य पद्धतीने झाली की शस्त्रक्रियेद्वारे, प्रसूतीदरम्यान नेमकी कोणती वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली तसेच मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय नोंदी उपलब्ध झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलीची गर्भधारणा, तिच्यावर झालेले उपचार आणि प्रसूवीनंतरची वैद्यकीय परिस्थिती याबाबदही विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता प्रकरणाबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी अरोली पोलिसांनी २१ वर्षीय कार्तिक कुरवे याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण, गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत झालेली वैद्यकीय प्रक्रिया आणि उपचारारांदरम्यान निर्माण झालेली गुंतागुंत याबाबत वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.