भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली/तिरोडा : नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील नागझिरा ब्लॉक अंतर्गत उमरझरी वनपरिक्षेत्रातील बंदरझरा बिटमध्ये गस्तीवर असताना वनरक्षक श्यामू महागू शरणागत (वय ४५) यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता घडली असून वनविभागासह परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरणागत हे नियमित गस्तीचे काम पार पाडत असताना दाट जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका तीव्र होता की त्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात वन्यजीव आणि मनुष्य यांचा वाढता संपर्क लक्षात घेता गस्ती पथकांची सुरक्षितता, अत्यावश्यक संरक्षण साधने, पुरेसे मनुष्यबळ, आधुनिक संपर्क व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अधिक सक्षम करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. यापूर्वीही अस्वलाच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने वनकर्मचाºयांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वनक्षेत्रात दिवस-रात्र कर्तव्य बजावणारे वन अधिकारी व कर्मचारीच सुरक्षित नसतील, तर व्याघ्र प्रकल्पालगत राहणारे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनकर्मचाºयांसाठी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना, प्रशिक्षण, संरक्षक साहित्य आणि जोखीम व्यवस्थापन प्रणाली तातडीने बळकट करण्याची मागणी होत आहे.