
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याची एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या भंडारा-पवनी मार्गावरील कोंढा-कोसरा येथे गेल्या ३ ते ४ वर्षांपासून प्रवासी निवारा (बस स्टॉप शेड) गायब झाला आहे. त्यामुळे येथे बसची वाट पाहणाºया प्रवाशांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि अबालवृद्धांना भर उन्हात किंवा पावसात उघड्यावर उभे राहावे लागत असून, त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ३-४ वर्षांपासून समस्या कायम मिळालेल्या माहितीनुसार, कोंढा- कोसरा येथे गेल्या २-३ वर्षांपूर्वी सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, या रस्त्याच्या कामादरम्यान किंवा त्यापूर्वीच म्हणजेच गेल्या ३-४ वर्षांपासून येथील जुना प्रवासी निवारा नाहीसा झाला आहे. या मुख्य चौकातून दररोज शेकडो प्रवासी, नागरिक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबतात. मात्र, हक्काचा निवारा नसल्याने प्रवाशांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते.
दुकानाच्या शेडचा आसरा; दुकानदार आणि प्रवाशांमध्ये खटके
उन्हाचा तडाखा आणि हवामानापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रवासी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांच्या शेडखाली आश्रय घेतात. यामुळे दुकानदार आणि प्रवासी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: बाजाराच्या दिवशी दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. अशा वेळी प्रवासी दुकानात उभे राहत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायात अडथळा निर्माण होतो. यातूनच अनेकदा प्रवाशांना दुकानदारांचे बोलणे (अपमानस्पद शब्द) देखील ऐकावे लागते. “यात प्रवाशांची चूक काय?” असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
…अन्यथा आंदोलनाचा इशारा!
या गंभीर समस्येची दखल घेत जिल्हा प्रवासी संघाचे अध्यक्ष सुनील मनोहरराव पनके यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मुख्य मागार्चे काम ज्या कंत्राटदाराकडे आहे त्यांनी, किंवा ज्या संबंधित विभागाने या रोडचे कंत्राट काढले आहे त्या विभागाने तात्काळ दखल घेऊन कोंढा-कोसरा येथे नवीन व सुसज्ज प्रवासी निवारा बांधावा, अशी मागणी सुनील मनोहरराव पनके यांनी केली आहे. प्रवाशांची ही गैरसोय लवकरात लवकर दूर न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाऊ शकतो, असे संकेतही मिळत आहेत.