भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असताना, याचाच गैरफायदा घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गोंदिया शहरालगतच्या दासगाव खुर्द येथे ही धडक कारवाई करण्यात आली असून १८ किलो पनीरसह एकूण १४६ किलो भेसळयुक्त साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
दासगाव खुर्द येथील मुन्नालाल बिशन यांच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात पनीर, दही, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा दूध भेसळ संयुक्त समितीला मिळाली होती. या तक्रारीच्या आधाराने जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त पथकाने आज दुपारी त्यांच्या घरी अचानक छापा टाकला. छापादरम्यान घरात अत्यंत अस्वच्छ वातावरणात दुग्धजन्य पदार्थ तयार होत असल्याचे दिसून आले. तपासात १८ किलो पनीर, ९० किलो दही, २० लिटर दूध, १६ लिटर ताक आणि २ किलो खवा असा एकूण मोठा साठा आढळून आला. प्राथमिक तपासात हे सर्व पदार्थ केमिकलयुक्त आणि भेसळयुक्त असल्याचे निष्पन्न झाले असून हे पदार्थ मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईतील सर्वात गंभीर बाब म्हणजे मुन्नालाल बिशन यांच्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी कोणतेही वैध कागदपत्र नव्हते. अन्न व औषध प्रशासनाचा परवाना, FSSAI लायसन्स तसेच वजन-माप विभागाचा परवाना देखील त्यांच्याकडे नव्हता. कोणतीही नोंदणी नसताना केवळ सणासुदीच्या काळात जास्त नफा कमवण्यासाठी हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. यानंतर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत जप्त केलेले सर्व १४६ किलो साहित्य त्याच ठिकाणी जमीनदोस्त केले. भेसळयुक्त दुधाचे नमुने प्रयोगशालात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात अशा प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून नागरिकांनीही कोणत्याही ठिकाणी संशयास्पद पदार्थ आढळल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या दूध भेसळ संयुक्त समितीने आज कारवाई केली. ज्या ठिकाणी कारवाई केली, त्या ठिकाणाबद्दल आम्हाला काही तक्रारी आल्या होत्या. तिथे जाऊन तपासणी केली असता, मुख्य म्हणजे त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता आणि वजन-मापाचाही परवाना त्यांच्याकडे नव्हता. आम्ही ${२}$ सर्व जप्त केले आहेत. त्या ठिकाणी आढळून आलेले मिल्क प्रॉडक्ट गुणवत्तेच्या निकषांवर अपेक्षित दर्जाचे आढळले नाहीत. त्यांचे सैंपल घेऊन लॅबला पाठवण्यात आले आहे.
— अभिजित घोरपडे, अपर जिल्हाधिकारी, गोंदिया