गांजा विक्री करणाऱ्या युवकाला शस्त्रासह अटक भंडारा डीबी पथकाची कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : शहरातील बाबा मस्तान शाह वॉर्ड परिसरात अवैध अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीविरुद्ध भंडारा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डीबी पथक) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी गांजा तसेच लोखंडी चाकू जप्त केला. इक्बाल खान नजीब खान (रा. बाबा मस्तान शाह वॉर्ड, भंडारा) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, १७ सप्टेंबर रोजी भंडारा ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती. बाबा मस्तान शाह वॉर्ड परिसरातील एका घरात अवैध अमली पदार्थ विक्रीसाठी आणून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन झडती घेतली. झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून ०.५३६ ग्रॅम निव्वळ गांजा आढळून आला. तसेच त्याच्याकडे लोखंडी चाकुसुद्धा मिळून आला.

विक्रीच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगल्याचा तसेच शस्त्र बाळगल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यानेही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी इक्बाल खान नजीब खान याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब)(२)(अ), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वेये भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि भंडारा पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष बोरकर, स.फौ. रोशन गजभिये, पोलीस हवालदार प्रशांत कुरंजेकर, अंकुश पुराम, अनुप वालदे, पोलीस सिपाई रोहन काळे, रोशन माटे, रोहित आंबाडे, सुमित पेशने तसेच महिला पोलीस सिपाई सोनाली कुथे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास भंडारा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *