भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकºयांना सुविधा व्हावी या करिता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना राबवून येत्या एका महिन्याच्या आत हे पांदन रस्ते पूर्ण करण्याचे निर्देश आम. नरेंद्र भोंडेकर यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस ते समिती चे अध्यक्ष म्हणून संबोधित करीत होते. त्याच प्रमाणे दोन्ही तालुक्यातील अतिक्रमण धारकांना एका महिन्याच्या आत पट्टे आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले.
स्थानीक तहसील कार्यालयात आज मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना आणि अतिक्रमण नियमानुकुल समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. आम. नरेंद्र भोंडेकर हे या दोन्ही समितीच्या अध्यक्ष पदावर असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या बैठकीत संबंधित रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पांदन रस्ते संदर्भात उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाºयांनी आता पर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा आढावा दिला व पुढील नियोजनाची माहिती सादर केली.
या वेळी आम. भोंडेकर यांनी अधिकाºयांना निर्देश दिले कि भंडारा पवनी या दोन्ही तालुक्यातील शेतकºयांना पांदन रस्त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या येत्या एका महिन्याच्या आत दूर करण्यात याव्या. शेतकºयांना शेतापर्यंत सुलभ व बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आम. भोंडेकर यांनी दिल्या. तसेच शेतकºयांच्या शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन त्यांच्या वेळेची, श्रमाची व खर्चाची बचत व्हावी आणि शेतीच्या विकासाला अधिक बळ मिळावे, या करिता मागेल त्याला पांदन रस्ते देवून शेत पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश ही दिले. सोबतच काही पांदन रस्ते हे अस्तित्वात आहेत परंतु नकाश्यात तेरस्ते दिसून येत नाहीत, अश्या रस्त्यांचे सर्व्हे करून त्यांचा आराखडा तयार करावे व त्यांना लवकरात लवकर नकाश्यात सामील करण्याचे निर्देश या वेळी आमदार भोंडेकर यांनी दिले. या बैठकीत उपविभागीय अधिकाºयांसह दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप विभागीय अभियंता, वन विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व समिती चे अन्य सदस्य उपस्थित होते.