नगर परिषद कंट्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

  • अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेची मागणी

  • जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन

  • किमान वेतन हा कंट्राटी कर्मचाऱ्याचा हक्क – भोंडेकर

मोरेश्वर बिसेने/भंडारा पत्रिका तुमसर : तुमसर नगर परिषद येथील कंट्राटी सफाई कामगारांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतन लागू करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी व सहाय्यक कामगार आयुक्त भंडारा यांना निवेदन देण्यात आले.

सफाई कर्मचारी हे समाजाच्या आरोग्याचे कणा आहेत. कोविड काळापासून आजपर्यंत जीव धोक्यात घालून काम करूनही त्यांना शुल्लक मानधनावर राबविले जात आहे, जे कामगार कायद्याचे सरळ उल्लंघन आहे.

कंट्राटदाराकडून त्यांना किमान वेतन, पी.एफ., ई.एस.आय.सी., बोनस, सुट्टी अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

या मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेने दिला आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हा महामंत्री विवेक भोंडेकर, अजय कनोजे, गोविंद भोंडेकर, रोहित निमकर, सरविंद मालाधरे, बाबू सय्यद, रामचंद्र उईके तसेच इतर सफाई कर्मचारी उपस्थित होते.

कंट्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन न देणे म्हणजे त्यांच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. शासनाचेच ठरविलेल्या कायद्यानुसार प्रत्येक कामगाराला जगण्यासाठी किमान वेतन मिळालेच पाहिजे. सफाई कर्मचारी हा समाजाचा पाया आहे, त्यालाच उपाशी ठेवणे योग्य नाही. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन किमान वेतन लागू करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पुकारावा लागेल.

— विवेक भोंडेकर, जिल्हा महामंत्री अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *