पालडोंगरीच्या तीन युवकांना तिरोड्यात जबर मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पालडोंगरी येथील तीन युवकांना तिरोडा शहरातील सलूनमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका अल्पवयीनासह तिघांनी लाकडी काठ्यांनी जबर मारहाण केल्याची घटना १८ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेत तिघेही युवक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश मदनलाल प्रजापती (२५), कार्तिक गजानन रहांगडाले (२३) व तेजस भरतलाल उरकुडे (२५) हे तिघे युवक सी. जे. पटेल महाविद्यालयासमोरील शेंडे सलूनमध्ये कटिंग करण्यासाठी आले होते. यावेळी तिघे आपापसात बोलत असताना जोरात हसल्याने तेथे उपस्थित तिरोडा येथील तीन युवकांनी ‘आमच्याकडे पाहून का हसता?’ असा जाब विचारला. त्यावरून वाद झाला.

वाद वाढल्यानंतर आरोपींनी घरी जाऊन लाकडी काठ्या आणल्या आणि तिन्ही युवकांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी लोकेश प्रजापती यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी रुद्र राकेश वाल्मीक (२२), गौरव दिलीप करोशी (२१) व एका अल्पवयीनाविरुद्ध कलम १०९(१), ११५ (१), ३५२, ३५१(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रुद्र वाल्मीक व गौरव करोशी यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *