
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या भंडारा जिल्ह्यात अखेर २३ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाची सुरुवात विजांच्या कडकडाटासह झाली. आकाशात मेघगर्जना होत असताना काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस बरसल्याने रस्त्यांवर पाणी साचले. अचानक आलेल्या या पावसामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली, तर शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.
यंदा मान्सून उशिरा सक्रिय झाल्याने आणि जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र आजच्या पावसामुळे शेतकºयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. तरीही हा पाऊस अपुरा असल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करीत असून, पेरणीसाठी सातत्याने आणि दमदार पावसाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली असली तरी सर्वत्र एकसारखा पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही भागात अजूनही शेतकरी प्रतीक्षेत आहेत. “आता पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला तरच खरीप पेरणीला वेग येईल,” अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली. दरम्यान, हवामानातील बदलामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरात गारवा पसरला आहे. पुढील काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.