मधमाशांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

शेतशिवारात फवारणी करण्यासाठी गेले असता मधमाशांनी केला हल्ला; उपचारदरम्यान मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात मधमाशांच्या हल्ल्यात ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आमगाव तालुक्यातील झालिया शिवारात ही घटना घडली. रवींद्र पटले असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या घटनेमुळे झालिया परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पटले यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र पटले हे झालिया येथील आपल्या शेतशिवारात फवारणी करण्यासाठी गेले होते. शेतात काम करत असताना अचानक मोठ्या संख्येने मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांनी त्यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मधमाशांच्या दंशामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रवींद्र पटले यांना तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थलळी धाव घेतली. या घटनेची नोंद घेण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

शेतशिवारात काम करत असताना अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी मधमाशांचे पोळे किंवा मधमाशांचा थवा आढळल्यास सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, रवींद्र पटले यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *