भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मातोश्री पांदण रस्ता खडीकरण कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मोहाडीसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पांदण रस्ता कामांबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनरेगा कायद्यानुसार अकुशल मजुरांकडून काम करून घेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात यंत्रसामग्रीचा वापर, जॉब कार्डधारकांच्याउपस्थितीबाबत अनियमितता तसेच निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेतकºयांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा मूळ उद्देशच धोक्यात आल्याचे नमूद करत जिल्ह्यातील सर्व कामांचीमंजूर आराखड्यानुसार स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामांची प्रलंबित देयके स्थगित करावीत, गुणवत्ता चाचणी करून दोषी अधिकारी, कंत्राटदार व संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनासोबत यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारी, सामाजिक संघटनांचे निवेदन तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत सादर करण्यात आलेल्या अर्जांच्या प्रती जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य माधवराव बांते, राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर, जिल्हा सचिव हिवराज उके गजानन पाचे, जयप्रकाश मसरके, माणिकराव कुकडकर, रवी बावणे, दिलीप चोपकर यांनी निवेदन दिले.