भंडारा पत्रिका / प्रतिनिधी दिघोरी (मोठी) : दिल्ली येथील जंतर- मंतर परिसरात शिक्षणातील न्याय, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित लाठीहल्ल्याचा दिघोरी (मोठी) तंटामुक्ती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. याबाबत ठाणेदार पोलीस स्टेशन दिघोरी मोठी येथुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीमार करणे ही लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारी घटना असून, अशा प्रकारामुळे देशातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तंटामुक्ती समितीसह युवकाने केंद्र व राज्य सरकारकडे घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाºयांवर कठोर कारवाई करण्याची, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
समितीच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाहीला घातक असून, सरकारने संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत. देशाच्या भविष्यासाठी लढणाºया विद्यार्थ्यांशी दडपशाहीची भूमिका स्वीकारणे योग्य नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी निवेदनावर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी स्वाक्षºया करून पाठिंबा दर्शविला. संबंधित निवेदनाची प्रत लोकसभा अध्यक्ष, भारताचे राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करावी. व दोषी अधिकाºयांवर कठोरशिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा.भविष्यात आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत यावेळी तंटामुक्त अध्यक्ष वसंता हटवार, रवी बोरकर,शरद साळवे, नरेश राऊत, रामलाल गोटेफोडे ,मंगेश बानेवार व आदी यूवक उपस्थित होते .