विदर्भात सर्वदुर पाऊस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने विदर्भात दमदार कमबॅक केले. वेधशाळेने मंगळवारी दिलेला आॅरेंज अलर्ट पावला. गेल्या दोन दिवसांपासून कुठे मध्यम, तर कुठे जोरदार सरींनी शिवार चिंब भिजले आणि कोमेजलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकºयांवर येणारे दुबार पेरणीचे संकट दूर झाले. हा पाऊस पुढचे दोन दिवस असाच मुक्कामी राहणार असून वेधशाळेने येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात ९ जुलैपासून पाऊस थांबला होता. या काळात विविध ठिकाणी तुरळक सरी बरसल्या, पण त्याला फार जोर नव्हता. १७ जुलैपासून पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, पण त्याचा फार लाभ झाला नाही.

मात्र सोमवारी पावसाची तीव्रता वाढली. गोंदिया, भंडारा, गडचिरोली व नागपूरमध्ये दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली, पण रात्रीपर्यंत संपूर्ण विदर्भ व्यापून घेतला. गोंदिया, भंडारा, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील काही भाग पावसाने झोडपून काढला. दोन दिवसात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धान पिकाला संजीवनी मिळाली असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांनी रोवणीच्या कामाला वेग दिला आहे. याशिवाय सोयाबिन व कापसाच्या वाढीसाठीही मदत मिळाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान हवामान विभागाने पुढच्या २६ जुलैपर्यंत विदर्भावर पावसाची मेहरनजर राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. या काळात बहुतेक जिल्ह्यात हलका ते मध्यम तीव्रतेने पाऊस होईल, अशी शक्यता आहे. अकोला, वाशिम व बुलढाणा वगळता इतर सर्व जिल्ह्यात पुढचे दोन दिवस २३ जुलैपर्यंत येलो अलर्ट दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *