विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव लाहोटी विद्यालयात विद्यार्थिर्मित गणेशमूर्तीची स्थापना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि अभ्यासासोबतच त्यांच्या अंगी दडलेल्या कलाकाराला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने बंसीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती बनविण्याची तसेच गणेश पोस्टर बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा, कलात्मकतेचा आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडवत विविध आकर्षक गणेशमूर्ती व पोस्टर्स तयार केली.

विशेष म्हणजे, स्पर्धा घेऊन केवळ बक्षिसे देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गणेशमूर्तीनाच शाळेत गणेशस्थापनेसाठी स्थान देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रत्यक्ष सन्मान मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर प्रधान तसेच संस्थेचे सचिव शशिकला प्रधान व संचालक जयंत प्रधान हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे व संपूर्ण कार्यक्रमाचे खूप कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख सौ. राठी मॅडम आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. बी. साकुरे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला. नियमित अभ्यास, तासिका, परीक्षा आणि शालेय वेळापत्रकाच्या धकाधकीतून विद्यार्थ्यांना थोडा विरंगुळा मिळावा, आनंदाने एकत्र येता यावे आणि आपल्या कलागुणांचा मुक्तपणे आविष्कार करता यावा, हाही या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू होता.

डेढ दिवसांच्या गणेशोत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गणेशआरती, सांस्कृतिक वातावरण आणि विविध उपक्रमांमुळे शाळेचा परिसर आनंदमय झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या कलाकृतींचे कौतुक केले, कलाकार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नैसर्गिक व इको-फ्रेंडली गणेशमूर्तीचे विसर्जन शाळेच्या परिसरातच पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे ‘कलेचा सन्मान, आनंदाचा उत्सव आणि पर्यावरणाची जपवणूक’ असा सुंदर संदेश या उपрамаतून देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या कलेला केवळ दाद न देता त्यांच्या कलाकृतीला प्रत्यक्ष व्यासपीठ आणि सन्मान देण्याचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासला निश्चितच बळ देणारा ठरला. अभ्यासासोबत कला, सर्जनशीलता, आनंद आणि पर्यावरणविषयक जाणीव यांचा सुंदर संगम घडविणारा हा गणेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *