• पेट्रोल भरल्यानंतरही वाहन सुरू होईना • अखेर रात्री विद्यार्थिनींवर ‘दे धक्का’ ची वेळ • पोलिसांनी धाव घेत पोहोचविले वसतिगृहात
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
भंडारा : दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात ड्युटी केल्यानंतर रात्री वसतिगृहाकडे परतणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींना अचानक रस्त्यातच अडकण्याची वेळ आली. ने-आण करणाऱ्या व्हॅनमधील पेट्रोल संपल्याने वाहन बंद पडले. पेट्रोल आणून टाकल्यानंतरही वाहन सुरू झाले नाही. अखेर रात्रीच्या अंधारात विद्यार्थिनींवर चक्क वाहनाला ‘दे धक्का’ देण्याची वेळ आली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत विद्यार्थिनींना सुरक्षितपणे वसतिगृहात पोहोचविले.
हा प्रकार मंगळवारी (२२ सप्टेंबर) रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या गेटसमोर घडला. या घटनेमुळे नर्सिंग विद्यार्थिनींच्या आणि व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारधा येथील नवयुगा नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रॅक्टिकल ड्युटी असते. ड्युटी संपल्यानंतर विद्यार्थिनींना वसतिगृहात नेण्यासाठी महाविद्यालयाकडून वाहनाची व्यवस्था करण्यात येते. मंगळवाररोही ड्युटी संपल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी रुग्णालयाच्या गेटसमोर वाहनात बसले, मात्र वाहन सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते सुरू झाले नाही, चालकाने वाहनातील पेट्रोल संपल्याचे सांगितले. त्यानंतर पेट्रोल आणण्यासाठी चालकाला जावे लागले, बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर पेट्रोल आणून वाहनात टाकण्यात आले. मात्र त्यानंतरही वाहन सुरू झाले नाही. त्यामुळे दिवसभर रुग्णालयात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी रस्त्यावर थांबावे लागले.
भंडारा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत वाहन पाठविले. सुरुवातीला विद्यार्थिनी पोलिसांच्या वाहनातून जाण्यास तयार नव्हत्या, मात्र पोलिसांनी त्यांना समजवून सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या वाहनातून जाण्यास होकार दिला. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींना सुरक्षितपणे त्यांच्या वसतिगृहात पोहोचविण्यात आले.
यासंबंधी नवयुगा नर्सिंग स्कूलचे संस्थापक गिरीश विराणी यांनी सांगितले की, विद्यार्थिनींना आपण घटनास्थलस्थी पोहोचलो; मात्र तोपर्यंत विद्यार्थी पोलिसांच्या वाहनातून वसतिगृहाकडे रवाना झाले होते. त्यानंतर वसतिगृहात जाऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली. भविष्यात असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. संबंधित वाहन फर्मचीयाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे विराणी यांनी सांगितले.
पोलिसांनी वेळीच धाव घेत विद्यार्थिनींना सुरक्षितपणे वसतिगृहात पोहोचविल्याने मोठा धोका टळला. मात्र नर्सिंगच्या विद्यार्थिनींना रात्री रस्त्यावर उतरून वाहनाला ‘दे धक्का’ देण्याची वेळ येऊ नये, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने ने-आण व्यवस्थेची काटेकोर तपासणी व सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे.
७ आसनी वाहनातून १३ ते १५ विद्यार्थींची वाहतूक?
या घटनेदरम्यान संबंधित वाहनाच्या क्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित वाहन सात आसनी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यातून सुमारे १३ ते १५ विद्यार्थी-विद्यार्थिनींची वाहतूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाहनाच्या अधिकृत आसनक्षमतेनुसार विद्यार्थिनींची वाहतूक करण्यात आली होती का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांकडून चौकशी
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी सांगितले. विद्यार्थिनींना ने-आणसाठी वापरण्यात आलेल्या वाहनात महिला सुरक्षा कर्मचारी उपस्थित होत्या का, वाहनाच्या अधिकृत आसनक्षमतेनुसार वाहतूक झाली का, यासह आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानुसार नियमानुसार पुढील कार्यवाही आणि आवश्यक सूचना देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दररोज रुग्णालयात ने-आण करणारे नियमित वाहन सर्व्हिसिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यामुळे त्या दिवशी पर्यायी छोटी व्हॅन वापरण्यात आली होती. एका वेळी आठ विद्यार्थिनींची ने-आण करून दोन पाळ्यांमध्ये वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला, माहिती मिळताच आपण घटनास्थळी पोहोचलो; मात्र तोपर्यंत विद्यार्थी पोलिसांच्या वाहनातून वसतिगृहाकडे रवाना झाले होते.