३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
गोंदिया:- शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. ही घटना ७ जुलै २०२६ रोजी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया तालुक्यातील दासगाव बुजुर्ग येथील रहिवासी धर्मेंद्र लक्ष्मीचंद बिसेन वय ३१ वर्षे हे आज सकाळी ११:३० च्या सुमारास त्यांच्या शेतावर गेले होते. पावसाळ्यात भात शेतीसाठी पाणी देण्याच्या उद्देशाने ते मोटर पंप सुरू करत होते. धर्मेंद्र हे मोटर पंप सुरू करण्यासाठी स्विचजवळ गेले असता अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. शेतात इतर कोणीही नसल्याने त्यांना तात्काळ मदत मिळू शकली नाही. काही वेळानंतर शेतावर गेलेल्या नातेवाईकांना ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दासगाव बुजुर्ग येथे शेती करत होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि लहान मुले असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शवविच्छेदननंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. धर्मेंद्र यांच्या निधनाने दासगाव बुजुर्ग आणि तेडवा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा
पावसाळ्यात ओल्या जमिनीवर आणि पाण्यात विजेची उपकरणे हाताळताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुटक्या तारा, उघडे कनेक्शन आणि निकृष्ट दर्जाची वायरिंग यामुळे अशा घटना घडतात. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, मोटर पंप सुरू करताना हात कोरडे असावेत, रबरी चपला वापराव्यात आणि योग्य अर्थिंग असलेल्या मोटारीचाच वापर करावा. तसेच शेतात काम करताना एकट्याने न जाता सोबत कोणाला तरी ठेवावे.