भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि अन्नदात्या शेतकºयांना दिवसा अखंडित, खात्रीशीर व भरवशाचा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्वाकांक्षी अशी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ युद्धपातळीवर हाती घेतली आहे. या योजनेचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि उज्ज्वल टप्पा पार पाडत, महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलांतर्गत येणाºया कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी गावात ३ मेगावॅट क्षमतेच्या अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच महावितरणच्या नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. राजेश नाईक यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) संपन्न झाले. ३३/११ केव्ही कळमेश्वर उपकेंद्राशी जोडलेल्या या नवीन प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ११०५ कृषी ग्राहकांना (शेतकºयांना) आता दिवसा नियमितपणे व सुरळीत वीज उपलब्ध होणार आहे.
मे. विश्वराज विदर्भ सोलर एनर्जी प्रा. लि. (विश्वराज एन्विओर्मेंटल कंपनी) या संस्थेने अत्यंत उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पाची यशस्वी उभारणी केली आहे. महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ योजनेअंतर्गत यापूर्वी काटोल तालुक्यातील ३३/११ के.व्ही. कचारी सावंगा उपकेंद्र परिसरात ४ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथे ३ मेगावॅटचा हा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे.या नव्या प्रकल्पामुळे नागपूर ग्रामीण मंडलांतर्गत आतापर्यंत कार्यान्वित झालेली एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ७ मेगावॅटवर पोहोचली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण २,०७९ शेतकºयांना आता रात्रीच्या वेळी वीज पुरवठ्यावर किंवा सिंचनासाठी रात्री-अपरात्री शेतात जाण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळाली आहे. शासनाच्या सौरऊर्जा धोरणांतर्गत उभारण्यात आलेला तोंडाखैरी येथील हा प्रकल्प ग्रामीण भागाच्या आर्थिक व कृषी विकासाला नवी गती देईल. सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे पारंपरिक विजेवरील ताण कमी होईल आणि पर्यावरणपूरक हरित ऊर्जेची निर्मिती होईल.
शेतकºयांना सिंचनासाठी रात्रीच्या वेळी होणारी कसरत व त्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने कृषी क्षेत्राला दिवसा वीज देण्यावर विशेष भर दिला आहे. आता दिवसा नियमित वीज मिळाल्यामुळे शेतकºयांना आपल्या पिकांचे सिंचन करणे, खते-पाण्याचे नियोजन करणे अत्यंत सुलभ होणार आहे, ज्याचा थेट आणि सकारात्मक प्रभाव पिकांच्या उत्पादकतेवर व दर्जेवर पडणार आहे. तसेच, या प्रकल्पामुळे पारेषण व वितरण दरम्यान होणारे नुकसान कमी होऊन वीज पुरवठ्याची विश्वासार्हता वाढली आहे. या उद्घाटनाच्या सोहळ्याला महावितरणचे नागपूर ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, कार्यकारी अभियंता (स्थापत्य विभाग) नारायण लोखंडे, कार्यकारी अभियंता (चाचणी विभाग) नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता (कळमेश्वर) रोशन शेंदरे, कळमेश्वर उपविभागातील अभियंता व कर्मचारी तसेच विश्वराज एन्विओर्मेंटल कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदेर्शानुसार मार्च २०२७ अखेर राज्यातील कृषी सिंचनासाठी शंभर टक्के वीज पुरवठा सौरऊर्जेद्वारे करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण मोहिमेला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाºयांचे आभार मानण्यात आले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कृषी वीज पुरवठा अधिक सक्षम आणि शाश्वत होत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.