भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमी तसेच पहिल्या श्रावणी सोमवारी शहरातील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात महिला भाविकांसह शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी शिवलिंगावर जल अर्पण करून ‘ॐ नम: शिवाय’ मंत्राचा जप केला. यावेळी कुमारी सानवी निनावे हिनेही भक्तिभावाने शिवलिंगावर जल अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतले. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असल्याने केवळ पहिल्या सोमवारीच नव्हे, तर संपूर्ण श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. भाविकांकडून पूजा, अभिषेक व जलाभिषेकासाठी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली जात आहे. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.