उल्हास तिरपुडे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरासह तालुक्यातील गावागावात सोलर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतरही अनेक ग्राहकांना महावितरणकडून हजारो रुपयांची वीजबिले पाठविली जात असल्याचा आरोप होत असून, यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, नव्याने स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या काही ग्राहकांनाही पूर्वीपेक्षा जास्त वीजबिले येत असल्याची तक्रार वाढत आहे. त्यामुळे महावितरणच्या बिलिंग पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. महिन्याच्या वाढत्या वीजबिलांपासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत अनेक नागरिकांनी आपल्या घरांवर सोलर यंत्रणा बसविली आहे. तसेच महावितरणच्या सूचनेनुसार अनेकांनी स्मार्ट मीटरही बसवून घेतले. मात्र, सोलर प्रणालीद्वारे स्वत:ची वीज निर्मिती होत असतानाही काही ग्राहकांना हजारो रुपयांची बिले येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. “सोलर लावून नेमका फायदा झाला की तोटा?” असा प्रश्न आता अनेक ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित ग्राहकांनी महावितरण कार्यालयात वारंवार धाव घेत बिलांबाबत स्पष्टीकरण मागितले असले, तरी समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. दरम्यान, ज्या ग्राहकांच्या घरी सोलर व्यवस्था नाही, अशा अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या ग्राहकांनाही पूर्वीच्या तुलनेत अधिक रकमेची वीजबिले मिळत असल्याचे बोलले जात आहे. वाढीव बिलांमध्ये दुरुस्ती करून घेण्यासाठी नागरिकांना महावितरण कार्यालयाच्या वारंवार फेºयामाराव्या लागत असल्याने त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्चही वाढत असल्याचे चित्र आहे. ग्राहकांच्या मते, बिलातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने बिलिंग प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करून चुकीची बिले तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी महावितरण प्रशासनाला सोलर व स्मार्ट मीटरधारकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन प्रत्येक प्रकरणाची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. चुकीच्या बिलांमुळे होत असलेली आर्थिक झळ थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्राहकांनी दिला आहे.