भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वैनगंगा नदीवरील बहुप्रतिक्षित जलपर्यटन प्रकल्पाच्या कामात आलेला अडथळा दूर झाला असून आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामांना पुन्हा गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाºयांसोबत प्रकल्पाच्या कामाला लवकरात लवकर पूर्ण करून प्रथम टप्प्यातील पर्यटन १ जानेवारी २०२७ पासून सुरु करण्याचा निर्धार केला. उल्लेखनीय आहे कि भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदीवर आंतरराष्ट्रीय जलपर्यटन तयार करण्याचे स्वप्न आम. नरेंद्र भोंडेकर यांनी बघितले होते आणि याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत प्रथम टप्प्याकरिता १०२ कोटी निधीला तत्काळ मंजुरी दिली आणि याचे काम सुरु करण्यात आले.
गेल्या काळात आलेल्या अडचणींमुळे याची कामे थांबविण्यात आली होती आणि नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधान आले होते. आता या अडचणी दूर झाल्या असून या प्रकल्पाला गोसे खुर्द विभागाकाडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे पत्र प्राप्त होताच आम. नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील जल पर्यटनाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार भोंडेकर यांनी प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या १ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्धार व्यक्त करित कामांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. सर्व कामे दर्जेदार, सुरक्षित आणि निश्चित मुदतीत पूर्ण करण्यावर भर देतआवश्यक यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जल पर्यटनाच्या प्रथम टप्प्यात भंडारा-१, कोरंभी, पाहेल/मौदी, अडयाळ/ चकारा व गोसे येथे जलपर्यटणाच्या प्रवेश मार्ग देण्यात येत असून भंडारा ते पवनी पर्यंत एकूण १५ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.