भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव येथील अंडरपास मार्गाच्या बांधकामादरम्यान गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. बांधकाम करणाºया सीमा कंपनीकडून दिशा दर्शक फलक, बॅरिकेड्स, सुरक्षा रक्षक व इशारा फलकांची पुरेशी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने आतापर्यंत चार ते पाच अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी मानेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित मेश्राम यांनी केली आहे. मानेगाव येथे अंडरपाससाठी सिमेंट रस्त्याचे बांधकाम दिवसरात्र सुरू आहे. मात्र, बांधकामस्थळी सुरक्षिततेचे मूलभूत नियम पाळले जात नसल्याचा आरोप होत आहे.
रस्त्यालगत लोखंडी प्लेट, सळया व बांधकाम साहित्य निष्काळजीपणे टाकून ठेवण्यात येत असल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे सर्व्हिस रोडची पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहतूक विस्कळीत होत असून वाहनधारक, नोकरदार, शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वी झालेल्या एका अपघातात खासदार प्रशांत पडोळे यांनी स्वत: जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, उपसरपंच अजित मेश्राम हे स्वत: रात्रीच्या वेळी खराब रस्त्यामुळे झालेल्या अपघातात जखमी झाले होते. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी वारंवार सूचना करूनही कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व जिल्हाधिकाºयांनी तातडीने हस्तक्षेप करून बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना सक्तीने लागू कराव्यात, अन्यथा आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.