६ दिवसात ८७२ किमी सायकलवारी पूर्ण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- आषाढी एकादशी निमित्त गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या ५ सायकलवीरांनी खडतर प्रवास करत पंढरपूरची वारी पूर्ण केली. तब्बल ६ दिवसात ८७२ किलोमीटर सायकल चालवत त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. या पथकाचे आज गोंदियात आगमन झाले असता नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या ऐतिहासिक वारीत गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्यासोबत कारगिल युद्धात एक पाय गमावले माजी सैनिक उदयभान निर्वाण यांचाही सहभाग होता. त्यांच्या जिद्द आणि भक्तीला पाहून संपूर्ण गोंदिया भारावून गेला.

६ दिवस, ८७२ किलोमीटरचा प्रवास

गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या या ५ सायकलवीरांनी आषाढी वारीसाठीविशेष नियोजन केले होते. गोंदियातून पंढरपूरपर्यंतचा ८७२ किलोमीटरचा प्रवास त्यांनी केवळ ६ दिवसात पूर्ण केला. रात्रंदिवस प्रवास करत त्यांनी प्रतिकूल हवामान, उन्हाचा तडाखा आणि डोंगराळ रस्ते पार केले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

यावेळी त्यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांच्या शेतात धानाचे भरघोस पीक यावे आणि दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,यासाठी विठुरायाला साकडे घातले. या पथकातील सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे माजी सैनिक उदयभान निर्वाण. कारगिल युद्धात देशासाठी लढताना त्यांनी एक पाय गमावला. मात्र त्यांच्या जिद्दीपुढे हे अंतरही कमी पडले. कृत्रिम पायाच्या सहाय्याने त्यांनी ही ८७२ किमीची वारी पूर्ण करून सर्वांना प्रेरणा दिली. आज पथक गोंदियात परतल्यावर शहरभर आनंदाचे वातावरण होते. नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *