◆ हजारो भाविक घेतात दर्शन; १ हजार ६७५ घटस्थापना
◆ विविध दुकाने सजली; जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : अश्विनो नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदिशक्ती शितला माता मंदिरात घटस्थापनेपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे. तर रोजच सायंकाळी आरती नंतर महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत. मंदिराच्या आவாரात आकर्षक रंगबेरंगी लाईटींग ने मंदिर सजले आहे. तर नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पाहायला मिळते आहे.
भंडारा येथील खांब तलाव हे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जात आहे. आदिशक्ती शितला माता मंदिरात गेल्या १०० वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यावेळी मंदिरात १ हजार ६७५ घटस्थापना करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबईसह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणांहून हजारो भाविक आदिशक्ती शितला मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे गर्दी अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आदिशक्ती शितला मंदिर समितीने विशेष नियोजन केले आहे.
दररोज सकाळ-संध्याकाळी ७ वाजता महाआरती, देवी जागरण, भजन व महाप्रसाद वाटप होत असते. नवरात्र उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक नितेश मोरे, आयपीएस डॉ. तेजस सारडा व भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा पोलीस स्टेशनचे निरीक्षक उल्हास भुसारी यांनी चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तसेच अशा गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही, बॅरिकेड्स, पार्किंग व्यवस्था आणि भाविकांसाठी रांगा लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळच्या आरती दरम्यान अनेक मान्यवर व्यक्तींना मान देण्याचे कार्य आदिशक्ती शितला माता मंदिर देवस्थान समितीच्या माध्यमातून केले जात आहे.
भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत आणि सहकार्याने दर्शन घ्यावे असे आवाहन जिल्हा पोलीस विभाग व आदिशक्ती शितला माता मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष ईश्वरलाल काबरा, सचिव सत्यनारायण व्यास, कोषाध्यक्ष धनराज धुर्वे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद भंडारा च्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनखाली भारत स्काउट आणि गाईडस जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना सामाजिक कार्याचे घडे गिरविण्याकरिता सेवा प्रकल्पांतर्गत ४ तास मंदिरात सेवा देत असतात. तसेच अनेक विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सेवा देत आहेत.
आकर्षक रांगोळीतून साकारली मातांची प्रतिकृती
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नामांकित चित्रकार चित्रा वैद्य व चंदा मुरकुटे यांनी रांगोळीच्या माध्यमातून साक्षात दुर्गा मातेची ३डी रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विविध दुकाने सजली
मंदिराच्या आवारात अश्विनी नवरात्र दरम्यान मातेला लागणाऱ्या पूजा अर्चना, हार, साहित्याबरोबर कमळची लाल पांढरे फूल, लहान मुलांच्या खेळण्याचे, अभ्यास साहित्य, मुलीवर महिलांना आवश्यक साहित्यांनी विविध दुकाने सजली आहेत.