आमगावच्या शासकीय धान्य गोदामातून तांदूळ चोरीचा प्रयत्न फसला!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यातील आमगाव येथील शासकीय धान्य गोदामाचे कुलूप तोडून तांदूळ चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन आणि मोबाईल असा एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून मिळून आला. दरम्यान, कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने संशयित चालक वाहन सोडून फरार झाला. या प्रकरणी पवनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आमगाव येथील शासकीय धान्य गोदामात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपीने गोदामाचे कुलूप तोडले. त्यानंतर गोदामातील ५० किलो वजनाच्या तांदळाच्या ७२ पोत्यांची चोरी करण्याच्या उद्देशाने ती एमएच ३६ एए १०४२ क्रमांकाच्या पिकअप वाहनात भरण्यात आली.

या तांदळाची किंमत प्रति किलो ३० रुपये प्रमाणे एक लाख आठ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तांदूळ वाहनात भरून चोरी करून नेण्याच्या प्रयत्नात असताना कोणीतरी आल्याचा संशय आरोपीला आला. त्यामुळे त्याने विवो कंपनीचा सुमारे पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल पिकअप वाहनातच ठेवून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना घटनास्थळावरून तांदळाची ७२ पोती, पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन आणि मोबाईल असा एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून तसेच वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशानुसार पवनी पोलिसांनी फरार पिकअप चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ई), ३३४(१) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे आणि पोलीस उपनिरीक्षक गजानन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोशन पडलीकर पुढील तपास करीत आहेत. फरार आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *