अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अपूर्ण; ९ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीमुळे चिंता वाढली ∷ ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर करून मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : शासनाच्या ई-पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, नव्याने वापरात आलेला ‘DCS MH’ ॲप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची तक्रार समोर येत आहे. ई-पीक नोंदणीची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले जात असून, उर्वरित नोंदणी वेळेत कशी पूर्ण करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
नव्या ॲपमुळे नोंदणी प्रक्रियेत अडथळे
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद शासनाच्या अभिलेखात करण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, यंदा नव्या ‘DCS MH’ ॲपच्या वापरादरम्यान शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. तांत्रिक अडचणी, मोबाईलची मर्यादित क्षमता आणि ॲप वापरण्याबाबत पुरेशी माहिती नसणे, अशा कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासनाकडून डिजिटल पद्धतीने नोंदणी करण्यावर भर दिला जात असला, तरी ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा, मोबाईलची उपलब्धता आणि तांत्रिक ज्ञान या बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असावा; मात्र त्याच प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा गैरसोय होत असेल, तर त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
५जी मोबाईलचा प्रश्न ऐरणीवर
नव्या ॲपच्या वापरासाठी ५जी मोबाईलची आवश्यकता असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकरी साध्या स्मार्टफोनचा वापर करतात. आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येक शेतकऱ्याला केवळ ई-पीक नोंदणीसाठी नवीन ५जी मोबाईल खरेदी करणे शक्य नाही. शेतीचा वाढता खर्च, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा आर्थिक भार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता नोंदणीसाठी नवीन मोबाईल आणावा की कुटून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, ॲप चालवण्यासाठी प्रत्यक्ष्यात ५जी मोबाईल अनिवार्य आहे की अन्य तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण होत आहे, याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. उपलब्ध मोबाईलवर ॲप सुरळीत चालेल, अशी व्यवस्था करणे ही कागची गरज आहे.
९ ऑक्टोबरची अंतिम मुदत; शेतकऱ्यांची धाकधूक
ई-पीक नोंदणी पूर्ण करण्यासाठी ९ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कमी कालावधीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करायची असताना ॲपमधील अडचणी दूर न झाल्यास अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ई-पीक नोंदणीचा संबंध पीक नोंदणीच्या अधिकृत अभिलेखाशी आणि त्यावर आधारित विविध शासकीय प्रक्रियांसंदर्भात असल्याने ही प्रक्रिया खेळेत पूर्ण होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ अंतिम तारीख जाहीर करून चालणार नाही, तर नोंदणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
ॲपमध्ये सुधारणा आणि मुदतवाढीची मागणी
ई-पीक नोंदणीची प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि सर्व प्रकारच्या स्मार्टफोनवर वापरण्याजोगी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ॲपमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईलच्या तांत्रिक म्यादाबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात आणि गरज पडल्यास पर्यायी नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच, अंतिम मुदतीपर्यंत नोंदणी पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांना पुरेशा वेळ मिळावा, यासाठी शासनाने ई-पीक नोंदणीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीणी जोर धरत आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. डिजिटल नोंदणीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे कोणतीही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा, ई-पीक नोंदणीची अंतिम तारीख जवळ येत असताना शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.