ऋृषीपंचमीला वैजेश्वर घाटावर महिलांची उसळली गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पवनी शहरात ऋषिपंचमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ऋषिपंचमीच्या निमित्ताने वैजेश्वर घाटावर पहाटेपासूनच महिलांची मोठी गर्दी झाली होती. विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतून हजारो महिला पवनी येथे दाखल झाल्या होत्या. वैनगंगा नदीत धार्मिक स्नान करून महिलांनी वैजेश्वर मंदिरासह परिसरातील विविध मंदिरांमध्ये पूजाअर्चना केली. पवनी शहराला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला असून शहरात सुमारे ३५० प्राचीन मंदिरे असल्याने पवनीला ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. उत्तर भारतातील काशीप्रमाणेच पवनीला ‘विदर्भाची काशी’ म्हणून संबोधले जाते. येथील वैजेश्वर घाटाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. वैजेश्वर घाटाची एक विशेष धार्मिक मान्यता आहे. वैनगंगा नदीच्या पात्रातील विशिष्ट ठिकाणी बेलाची पाने सोडली असता ती त्याच ठिकाणी पाण्यात बुडतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी शिवपिंड असल्याने भाविक बेलपत्र अर्पण करून भगवान शिवाची पूजा करतात.

ऋषिपंचमीच्या दिवशी महिलांकडून व्रत व धार्मिक विधी केले जातात. वर्षभरात धार्मिक आचार-विचारांचे पालन करताना झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून अनेक महिला ऋषिपंचमीचे व्रत करतात. ऋषीमुनींचा वास असलेल्या पवित्र स्थळी स्नान करून पूजा-अर्चना केल्यानंतर त्या व्रताची सांगता करतात. व्रत सोडताना विशेष पद्धतीने तयार केलेल्या भाजीपाला व तांदळाच्या भाताचा नैवेद्य केला जातो. ऋषिपंचमीच्या निमित्ताने नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली तसेच भंडारा जिल्ह्यातील विविध भागांतून महिला पवनी येथे आल्या होत्या. वैनगंगा नदीत धार्मिक स्नान केल्यानंतर महिलांनी नदीकाठावरच स्वयंपाक करून पूजा-अर्चना केली व त्यानंतर व्रत सोडले. यावेळी पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. विजया राजेश नंदुरकर, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, तहसीलदार सतीश साळवे, नायब तहसीलदार सुभद्रा धुर्वे, नायब तहसीलदार किशोर राऊत, पटवारी सव्वा लाखे, तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालय पवनीचे वैद्यकीय अधिकारी आशिष मोहरकर व त्यांचे पथक उपस्थित होते.

पवनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे, पत्रकार लियाकत अली, सेवानिवृत्त प्राध्यापक श्रीकृष्ण शिवनकर, भाजप शहराध्यक्ष संदीप नंदरधने, तालुकाध्यक्ष तिलक वैद्य, नगरपरिषद उपाध्यक्ष सोनू बावनकर, नगरसेवक सोनू दंडारे, नगरपरिषद प्रशासन अधिकारी आरिफ शेख, प्रतिक धनगरधरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश नंदुरकर, वैजेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर उरकुडकर, सचिव महादेव लिचडे, प्रकाश पोटफोडे, राजू चोपकर, मनोहर खडगी,सुरेश अवसरे, राजेश येलसट्टीवार, शिवदास शिवरकर, लोमेश ठेंगडी, दिलीप देशमुख, विनोद उरकुडकर, कैलास कावळे, रामभाऊ चामोर्शिकर, विलास घोडीले, ऊरकुडा शिवरकर, दत्तू हटवार, विनायक फूलबाधे, भास्कर आसी, प्रकाश मेश्राम, राजू रायकवार आदींनी यात्रेच्या आयोजनात विशेष सहकार्य केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *