भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली :केसलवाडा (सानगडी) येथील गट क्र. ९ मधील वनहक्क पट्टा व त्यासंदभार्तील कथित अनियमिततेची चौकशी करून संबंधित पट्टा रद्द करण्याच्या मागणीसाठी सात कुटुंबांनी सोमवार, दि. ३१ आॅगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. गट क्र. ९ मध्ये गेल्या सुमारे ५० वर्षांपासून वास्तव्यास असल्याचा दावा करणाºया उपोषणकर्त्यांनी तातडीने मौका चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली असून, कार्यवाही न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. उपोषणकर्त्यांमध्ये विजय खोब्रागडे, प्रकाश खोब्रागडे, उमेश खोब्रागडे, रवि खोब्रागडे, भिमराव खोब्रागडे, अरविंद खोब्रागडे, ताराचंद सुखदेवे, विशाल खोब्रागडे आणि मुकुंदराव खोब्रागडे यांच्या कुटुंबांचा समावेश आहे. संबंधित कुटुंबांनी वनहक्क पट्ट्यासाठी दावे सादर केले असून अद्याप त्यांना पट्टा मिळालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, टेकराम रघु भोयर यांचे राहते घर गट क्र. ८ मध्ये असताना त्यांना गट क्र. ९ मधील ०.०३७ आर क्षेत्राचा वनहक्क पट्टा कोणत्या आधारावर देण्यात आला, असा सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. गट क्र. ९ मध्ये भोयर यांचा प्रत्यक्ष कब्जा अथवा अतिक्रमण नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत केसलवाडा अंतर्गत त्यांना रमाई आवास योजना व इतर घरकुल योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या वास्तव्यासह जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. टेकराम भोयर यांच्या वनहक्क दाव्याशी संबंधित ‘क’ प्रत अतिक्रमण पंजी, ग्रामसभेचा ठराव, वनविभागाचा नमुना ‘अ’ तीन पिढ्यांची वंशावळ व जीपीएस मोजणी नकाशाची सखोल तपासणी करण्याची मागणी आहे. कागदपत्रे चुकीची किंवा खोटी आढळल्यास दोषींवर तसेच चौकशी न करता पट्टा मंजूर झाल्यास संबंधित अधिकारीकर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.