गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

मोरेश्वर बिसने/ भंडारा पत्रिका तुमसर: आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने तुमसर पोलिस ठाण्यांतर्गत तालुकास्तरीय शांतता व जातीय सलोखा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. राजाराम लॉन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी उपस्थित राहून गणेशोत्सव मंडळांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सव मंडळांनी डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सार्वजनिक गणेशोत्सव सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांच्या प्रमुखांनी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीला एसडीओ अंजली भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, तहसीलदार उपेश अंबादे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, तुमसरचे ठाणेदार सुभाष बारसे, सहायक अभियंता प्रशांत महाजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मिसुरकर, आंधळगावचे ठाणेदार नितीन राठोड, सिहोºयाचे ठाणेदार विजय कसोधन, गोबरवाहीचे ठाणेदार अभिजीत पाटील यांच्यासह अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अशा बातम्या सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. जातीय-धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये किंवा कृत्ये टाळावीत, असे आवाहनही करण्यात आले. अंमली पदार्थांचे सेवन टाळावे आणि परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे पोलिस प्रशासनाने सांगितले. उत्सवादरम्यान वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. बैठकीचे संचालन प्रा. राहुल डोंगरे यांनी केले, तर आभार ठाणेदार अभिजीत पाटील यांनी मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *