ओबीसी जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्रपणे आणि अचूक नोंद होण्यासाठी स्वतंत्र ओबीसी कॉलम तसेच प्रमाणित ड्रॉप-डाऊन मेन्यू उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ओबीसी संघर्ष समिती,तालुका मोहाडी यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मोहाडी प्रभारी तहसीलदार पल्लवी मोहाडीकर यांच्यामार्फत केंद्र सरकारला देण्यात आले. मोहाडी तहसील कार्यालयासमोर बुधवार दि.२ सप्टेंबर २०२६ ला एक दिवसीय धरणे देण्यात आले. यावेळी मोरेश्वर सार्वे, डॉ.आशिष माटे, देवेंद्र ईलमे, श्रीकांत येरपुडे, राजेश मते, ललिता देशमुख, शुभदा झंझाड, लक्ष्मण माहुले, विजय दमाहे, अतुल मते, पंजाब कारेमोरे, पंढरी अतकरी, अंकुश दमाहे, उमेश बुराडे, विनायक बुरडे, रवी डहाके, राजू माटे आधी बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते.

जनगणनेत जात नोंदविताना ओपन-एंडेड पद्धतीऐवजी प्रमाणित यादीचा वापर करावा, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. २०११ मधील सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत ओपन-एंडेड पद्धतीमुळे जाती-पोटजातींच्या मोठ्या प्रमाणात नोंदी झाल्या. उच्चार, स्पेलिंग आणि स्थानिक नावांतील फरकामुळे या आकडेवारीचे वर्गीकरण करताना अडचणी निर्माण झाल्याचा दावा समितीने केला आहे. ओबीसींची अचूक लोकसंख्या उपलब्ध झाल्यास शिक्षण, रोजगार, आरक्षण, अर्थसंकल्पीय तरतुदी आणि सामाजिक कल्याणाच्या योजनांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे समितीने निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम, प्रमाणित ड्रॉप-डाऊन यादी आणि अचूक जातनिहाय नोंदणीची व्यवस्था तातडीने लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास १ आॅक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा तसेच जनगणनेवर बहिष्काराचा इशारा समितीने दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *