ग्रामपंचायत ‘देव्हाडी’चा कारभार वादाच्या भोवºयात

ग्रामसेवकाविना ठराव अन् पदोन्नतीसाठी लाचेची मागणी; ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
तुमसर : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदींना थेट हरताळ फासत नियमबाह्य कारभार चालवण्याचा गंभीर प्रकार देव्हाडी ग्रामपंचायतीत समोर आला आहे. ग्रामसेवकाच्या उपस्थितीतच अनधिकृतपणे ग्रामसभा उरकून लिपिक भरतीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला आहे. त्यातच, तब्बल २० वर्षांपासून सेवेत असलेल्या एका सुशिक्षित महिला कर्मचाऱ्याला पदोन्नती नाकारून तिच्याकडे लाच मागितल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
देव्हाडी ग्रामपंचायतीत ममता गयगये या गेल्या २० वर्षांपासून चपराशी म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. पदवीधर आणि संगणकाचे उच्च शिक्षण घेतलेल्या ममता गयगये या नियमानुसार लिपिक पदाच्या पदोन्नतीसाठी पूर्णपणे पात्र आहेत. अनुभवी आणि सुशिक्षित कर्मचाऱ्याला सेवाज्येष्ठतेनुसार संधी देणे हे नैसर्गिक न्यायाचे तत्त्व असताना, त्यांना डावलून बाह्य भरतीचा घाट घातला जात आहे.

नियम धाब्यावर बसवून ग्रामसभा?
ग्रामपंचायतीच्या कारभारात प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवकाची उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, ग्रामसेवकाच्या उपस्थितीतच घाईघाईने ग्रामसभा घेऊन लिपिक भरतीसारखा अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. कायद्यातील तरतुदींना डावलून घेतलेल्या या निर्णयामुळे या संपूर्ण प्रक्रियेच्या कायदेशीर वैधतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ऑडिओ क्लिपमुळे ‘लाचखोरी’ चव्हाट्यावर
या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे! पात्र असूनही हक्काच्या पदोन्नतीसाठी ममता गयगये यांच्याकडून थेट नियुक्तीच्या बदल्यात लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच आणि काही सदस्यांनी या पैशांची मागणी केल्याची चर्चा असून, संबंधित फोन रेकॉर्डिंग सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.

कारਵਾਈची मागणी
या धक्कादायक प्रकारामुळे देव्हाडी ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. नियमबाह्य ठरवून मंजूर केलेले सर्व ठराव तात्काळ रद्द करण्यात यावेत, लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अन्यायग्रस्त महिला कर्मचाऱ्याला त्वरित पदोन्नती देऊन न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वरिष्ठ अधिकारी यावर काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *