भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : माणूस मेल्यानंतरही दुसºयाच्या शरीरात जिवंत राहू शकतो, हा मानवतेचा संदेश देत सावरी (जवाहरनगर) येथील समाजसेवी सेवकराम साहू यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या या थोर निर्णयाबद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटी, भंडारा तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रेडक्रॉसचे मानद सचिव डॉ. नितीन तुरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. साहू यांनी अवयवदानासंदर्भातील लिखित पत्र खरबी (ठाणा पेट्रोल पंप) येथे आयोजित सभेत सुपूर्द केले. ही सभा रेडक्रॉस सोसायटी, “ओळख” महाग्रंथ प्रकाशन मंडळ आणि मीरा महिला बहुउद्देशीय समिती, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती. यावेळी मीरा भट, अॅड. कीर्तिमाला जयस्वाल, सईद शेख, चिंधुजी वंजारी यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. रुद्रसेन भजनकर, मुकुंदा वंजारी, विक्की डोए, अमोल माणूसमारे, सुमन अराठे, राजेश गाडरिए, नम्रता बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साहित्यिक राजू खवसकर यांनी केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रेडक्रॉसच्या वार्षिक आमसभेत आसगाव पूरग्रस्तांना मदत केल्याबद्दल जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्या हस्तेही सेवकराम साहू यांचा सन्मान करण्यात आला होता.