भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : जनगणना २०२७ च्या दुसºया टप्प्यात ओबीसी समाजाची स्वतंत्र व स्पष्ट नोंद करण्यासाठी जनगणना प्रपत्रात ‘ओबीसी’ असा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, या प्रमुख मागणीसाठी सकल ओबीसी संघटना लाखांदूरच्या वतीने मंगळवार दि. १ सप्टेंबरला लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जनगणना २०२७ मध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र लोकसंख्या अधिकृतरीत्या नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे. ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती तसेच शैक्षणिक मागासलेपणाची वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध झाल्यास शासनाला ओबीसी समाजाच्या विकासासाठी प्रभावी धोरणे आखणे आणि योजनांचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत ओबीसी समाजाच्या लोकसंख्येबाबत अपेक्षित स्वरूपाची स्पष्ट व अधिकृत आकडेवारी उपलब्ध न झाल्याने आजही ओबीसी समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाबत प्रश्नकायम असल्याची भूमिका संघटनेने मांडली. त्यामुळे २०२७ च्या जनगणनेत ओबीसींची नोंद स्वतंत्रपणे करून अचूक आकडेवारी समोर आणावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.