भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : तालुक्यातील ग्रामसेवकांनी ग्रामसभांना उपस्थित राहण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन ग्रामसेवकांच्या उपस्थितीतच ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. याबाबत बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामसभा घेणे, इतिवृत्त लेखन, आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देणे तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांना अधिकृत उत्तरे देताना सरपंच तथा ग्रामप्रशासनाला अनेक अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद आहे. परिणामी ग्रामसभेच्या कामकाजाची अनावश्यक जबाबदारी सरपंचांवर येत असून, ग्रामस्थांशी वादविवादाची परिस्थिती निर्माण होत असल्याची भूमिका संघटनेने मांडली.
ग्रामसभा सचिव म्हणून ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असल्याने बहिष्कार सुरू असेपर्यंत ग्रामसभा घेण्यात येऊ नयेत, तसेच ग्रामसेवकांनी नियमित उपस्थित राहून सचिवाची जबाबदारी पार पाडल्यानंतरच ग्रामसभा घेण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट लेखी निर्देश द्यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामसेवक ग्रामसभेला उपस्थित नसतील तर ग्रामसभा होऊ देणार नाही, अशी भूमिका बहुतांश गावांतील ग्रामस्थांकडून व्यक्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सरपंचांना ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. ग्रामसेवक, सरपंच व प्रशासन यांच्या कर्तव्यांची स्पष्ट विभागणी करून एकसमान कार्यपद्धती निश्चित करावी आणि ग्रामसभेचे कामकाज पारदर्शक व नियमानुसार पार पडण्यासाठी लेखी आदेश निर्गमित करावेत, अशी विनंती सरपंच संघटनेने केली आहे. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुणभाऊ बावनकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर खेडीकर, कोषाध्यक्ष सुधीर मिसार व सचिव अस्मिता लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांनाही देण्यात आल्या.