झाडावर चढलेल्या बिबट्याच्या रेस्क्यूसाठी वन विभागाची धावपळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील सोनेगाव, बिबीटोला, नहरटोला व शेजगाव परिसरात मागील १५ ते २० दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (३ आॅगस्ट) दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास बिबीटोला येथील शेत परिसरात बिबट्याने एका इसमावर हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर अनेक कुत्र्यांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने तो जवळील एका उंच झाडावर चढून बसला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. माहितीनुसार, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यापूर्वी २६ जुलै रोजी गावातील शाळेजवळील शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. ग्रामस्थांनी ते सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात दिले होते. मात्र त्यानंतरही परिसरात बिबट्याची हालचाल सुरूच असल्याने वन विभागाकडून सतर्कता बाळगण्यात येत होती.

सोमवारी शेतात रोवणीचे काम सुरू असताना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने महिला शेतमजूर व इतर शेतकरी घाबरून शेतातून बाहेर पडले. दरम्यान, एका इसमावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नागरिकांचा गोंधळ आणि कुत्र्यांचा पाठलाग यामुळे बिबट्याने जवळील उंच झाडाचा आसरा घेतला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी रेस्क्यू आॅपरेशन हाती घेण्यात आले. मात्र बातमी लिहीपर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नव्हते. परिसरात बिबट्याचा वारंवार वावर होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *