भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथील बाजार चौकात असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अज्ञात व्यक्तीने संशयास्पद स्वरूपाचा उतारा ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ बौद्ध बांधवांनी रविवारी वडेगाव बंदची हाक देत आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा बंदोबस्त तैनात केल्याने वडेगाव पोलीस चौकीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. वडेगाव येथील रहिवासी गुलाब अनिल साखरे यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १९ आॅगस्टच्या रात्री ११ वाजेपासून २० आॅगस्टच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला रुईच्या पानावर भात ठेवून त्यावर कांदा ठेवला. त्यावर खिळा ठोकण्यात आला होता. तसेच एका कागदावर ‘शत्रू’ असा मजकूर लिहून ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तिरोडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम करीत आहेत.
दरम्यान, सध्या श्रावण महिना सुरू असून रविवार, २३ आॅगस्ट रोजी वडेगाव येथील माता मंदिरातून कावड यात्रा काढण्यात येणार होती. ही यात्रा गावातील विविध मंदिरांमध्ये पूजाअर्चा करून चोरखमारा येथील शिवमंदिराकडे जाणार असल्याने तसेच त्याच दिवशीघटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोंदिया येथून अतिशीघ्र कृती दलासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वडेगाव येथे तैनात करण्यात आला. गोंदिया जिल्हा अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी वडेगाव येथे भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने आणि पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, माता मंदिरातून निघालेली कावड यात्रा गावातील विविध देवीदेवतांच्या मंदिरांमध्ये पूजाअर्चा करून चोरखमारा येथील शिवमंदिराकडे शांततेत रवाना झाली. दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून बौद्ध बांधवांचा मोर्चा काढण्यात आला. घटनेमागील व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करावी आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली. हा मोर्चाही शांततेत पार पडला. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत वडेगावातील बाजारपेठ व दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे वडेगाव बंद शांततेत यशस्वी झाला. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.