भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : मागील पाच ते सहा दिवसांपासून तिरोडा शहरातील विविध भागांत मध्यरात्री फिरणाºया एका अस्वलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शनिवारी रात्री हे अस्वल दवनीवाडा परिसराकडे निघून गेल्याने तिरोडा वासीयांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या सहा दिवसांपासून या अस्वलाचे शहरात मुक्त संचार सुरू होता. सुरुवातीला मोदी टोला मार्गावरील भूतनाथ मंदिर परिसरात हे अस्वल दिसून आले होते. याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; मात्र काही वेळातच अस्वल नजरेआड झाले. यानंतर दुसºया दिवशी गॅस एजन्सी परिसरात तसेच कुंभलकर यांच्या घरासमोरून साई कॉलनीकडे जाताना ते दिसले.
शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेºयांमध्येही अस्वलाचे हालचाली कैद झाल्या. दरम्यान, शनिवारी रात्री खैरलांजीमार्गावरील सी. जे. पटेल महाविद्यालया समोरील पिंपळाच्या झाडावर हे अस्वल चढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. झाडावरील वानरांच्या आवाजामुळे नागरिकांनी गर्दी केली असता अस्वल स्पष्टपणे दिसून आले. वन विभागाला पुन्हा माहिती देण्यात आली आणि अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच अस्वल झाडावरून उतरून न्यायालय परिसरातून खैरलांजी मार्गावरील साई पेट्रोल पंपाकडे गेले.
यानंतर दवणीवाड्याकडे जात असताना गस्तीवरील पोलिस वाहनाच्या उजेडात ते दिसून आले. पोलिसांनी वाहनाचा हॉर्न वाजवून अस्वलाला हुसकावून लावल्याने ते दवनीवाडा परिसराकडे वळल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. सलग पाच ते सहा दिवस शहरात फिरून भीतीचे वातावरण निर्माण करणारे हे अस्वल अखेर शहराबाहेर गेल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्री एकटे बाहेर न पडण्याची सूचना दिली आहे. मात्र या अस्वलाने दवनीवाडा परीसराकडे आपले बस्तान नेल्याने तिरोडा वासीयांनी सुटकेचा स्वास सोडला.