निकृष्ट दुरुस्तीमुळे रस्त्यावर खड्डे; अपघाताचा धोका वाढला, नागरिकांमध्ये संताप
महावितरण कंपनीकडून ३३ केव्ही विद्युत पुरवठा करणारी रोहितवाहिनी भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामानंतर रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७२ वरील खोधकामाच्या ठिकाणी माती व मुरूम टाकून केलेली वरवरची दुरुस्ती आता खचू लागल्याने रस्त्यावर खोलगट भाग आणि खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था
नाकाडोगरी-राजापूर मार्गावर योजनाहिनी टाकण्यासाठी रस्ता आडवा खोदून चर तयार करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर खोडलेला भाग व्यवस्थित बुजवून रस्त्याची पूर्ववत दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित ठिकाणी केवळ माती व मुरूम टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या मार्गावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे खोधकाम केलेल्या ठिकाणी टाकलेली माती व मुरूम खचत असून, रस्त्यावर खोलगट भाग तयार झाले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे सहज लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
दुचाकीस्वारांना शारीरिक त्रास
रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाहन चालवताना दुचाकीस्वारांना मोठ्या धक्कयांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाठ, मान आणि कंबरेच्या दुखण्याचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खराब रस्त्यामुळे प्रवास त्रासदायक होत असून, वाहनांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः, रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, खोधकामानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित कंत्राटदाराच्या कामाची तपासणी करून निष्काळजीपणा आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन खोधकाम केलेल्या ठिकाणांची पाहणी करावी आणि रस्त्यावरील खड्डे डांबर किंवा काँक्रिटच्या साहाय्याने योग्य पद्धतीने बुजवून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून येत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.