भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत तीन गाईंचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिरोडा नगरपरिषद प्रशासनाला जाग आली असून शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तिरोडा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सोबतच मोहनलाल चौक, पोलीस स्टेशनसमोर, स्टेशन मार्ग, खैरलांजी मार्ग आदी प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट गोवंशीय जनावरे दिवस-रात्र रस्त्यावर ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरपरिषद व पोलिसांकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.
रविवारी (१६ आॅगस्ट) रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान सुकळी नाका परिसरातील पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन गाईंना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाईंचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच तिरोडा न्यायालयासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत आणखी एका गाईचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नगरपरिषदेने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सहकायार्ने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली. नगरपरिषदेचे कंत्राटी कामगार मनोज लारोकर, आशिष लिंल्हारे, राजू बटवार, विनोद नागपुरे, नारायण दूधबुरे, मेघनाथ नागपुरे, विकी सोनवणे व दीपक कावळे यांच्या पथकाने १९ आॅगस्ट रोजी पोलीस स्टेशन व शहीद मिश्रा विद्यालय परिसरातून १० मोकाट गाई पकडून साकोलीजवळील गराडा येथील गोशाळेत पाठविल्या. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी दिली. शहरातील जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.