भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान उत्पादक शेतकºयांना सरकारने जाहीर केलेला बोनस तातडीने देण्यात यावा, ऊस व दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, तसेच नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला आहे. केवळ घोषणा नकोत, तर शेतकºयांना त्यांच्या हक्काचा पैसा आणि प्रश्नांवर ठोस निर्णय मिळाला पाहिजे. लोकहितासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी मोहाडी येथे आयोजित धडक मोर्चादरम्यान दिला. शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांसह २५ प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने बुधवारी मोहाडी तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
पक्षाचे नेते आमदार रोहित पवार, सलील देशमुख यांच्या नेतृत्वात तसेच माजी आमदार व भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. चौंडेश्वरी मंदिर परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. विविध मागण्यांच्या घोषणा देत मोर्चेकरी तहसील कार्यालयावर पोहोचले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर मोहाडीच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनात धानाला प्रतिक्विंटल ३,५०० रुपये हमीभाव देण्यात यावा, शासनाने जाहीर केलेला बोनस तातडीने शेतकºयांच्या खात्यात जमा करावा, संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच उन्हाळी धानाचे प्रलंबित चुकारे त्वरित अदा करण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यासोबतच वृद्धापकाळ पेन्शन दर महिन्याच्या २ तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, बायोमेट्रिकमधील तांत्रिक त्रुटी दूर करून रेशन व पेन्शनचा लाभ सुरळीत करण्यात यावा,‘लाडकी बहीण’ योजनेचे बंद पडलेले लाभ पूर्ववत करावेत, अशी मागणी करण्यात आली.
महिलांना एसटी बस प्रवासात मिळणाºया ५० टक्के सवलतीतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, मनरेगा मजुरीचे प्रलंबित हप्ते तातडीने देण्यात यावेत, नगरपंचायतीच्या कररचनेचा पुनर्विचार करून ती पुनर्रचित करण्यात यावी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांनी शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे स्पष्ट करत सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) भंडारा जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे, माजी आमदार सुनील भुसारा, सलील देशमुख, रविकांत बोपचे, अतुल वांदिले, हिरालाल नागपुरे, राणीताई ढेंगे, संदीप ताले, नितेश मारवाडे, चंद्रशेखर भिवगडे, उमेश पाटील, हंसराज आगासे, आटूभाऊ तुरकर, सेवक चिंधालोरे, हेमराज नागफासे, मेहताबसिंग ठाकूर, गौरव नवरखेले, देवश्री सहारे, मधुकर चौधरी, अनिल जिभकाटे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.