भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोंदिया येथे १९ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ मध्ये अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल, साकोली येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण पाच पदकांची कमाई केली. एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत शिस्त, आत्मविश्वास आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत विविध वजनी गटांमध्ये यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे नियमित सराव, चिकाटी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
अंडर-११ मुली गटात श्रुष्टी संजय कापगटे हिने -२० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच गटातील हेनजल निनाद राऊत हिने -२२ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले. अंडर-१४ मुली गटात तिथी संदीप तिडके हिने -३२ किलो वजनी गटात कांस्यपदक, तर काव्या विशाल शामकुवार हिने -३५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकून शाळेच्या पदकसंख्येत भर घातली. अंडर-१४ मुलांच्या गटात अनुराग हेमंत चव्हाण याने -३२ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व विद्यार्थ्यांना तायक्वांदो प्र-ि शक्षक प्रवीण कठाने यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचेच फलित या स्पधेर्तील यशाच्या रूपाने दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे चेअरमन, डायरेक्टर, सीईओ, प्राचार्या, उपप्राचार्या तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही अशीच चमकदार कामगिरी करून शाळेसह साकोली व भंडारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या या यशाचे श्रेय त्यांच्या कठोर परिश्रमाला, पालकांच्या सहकार्याला आणि प्रशिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला दिले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल, साकोली ही केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सातत्याने आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.