भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : देशभरात वारंवार घडणाºया स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि शांततेने आंदोलन करणाºया विद्यार्थ्यांवर होणाºया अमानुष हिंसाचाराच्या निषेधार्थ ‘जागरूक नागरिक मंच, तुमसर’च्या वतीने शहरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी गणेश दिघे यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर हा मोर्चा शहरातील मातोश्री लॉन येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, तुमसर येथे धडकला. या मोर्चामध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांवर होणारा पोलिसांचा हिंसाचार सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मंचाने केला आहे. यात राजकीय गुंडांचा सहभाग असणे हे अत्यंत निंदनीय असून, हे कृत्य भारतीय लोकशाही, राज्यघटना व सर्वसामान्यांचे मूलभूत अधिकार चिरडण्यासारखे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जो खेळ सुरू आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा प्रणाली हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असल्याचे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. शिक्षणातील भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा. वारंवार होत असलेल्या सर्व परीक्षा पेपरफुटी प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोषी अधिकारी, संस्था व संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी तातडीने तांत्रिक व प्रशासकीय सुधारणा राबविण्यात याव्यात.
शिक्षणाचे खाजगीकरण रोखून सर्वांना समान, मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरविण्याची जबाबदारी सरकारने उचलावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व घटनात्मक हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यात यावेत. सदर दिलेले हे निवेदन भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्रालयांकडे तात्काळ पाठविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, वरील मागण्यांवर त्वरित कार्यवाही करून न्याय न मिळाल्यास, भविष्यात लोकशाही मागार्ने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जागरूक नागरिक मंच आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे.