शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसरच्या नामांतरासाठी १५ आॅगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) नामांतरणाबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण विलंबाच्या निषेधार्थ स्वराज्य युवा एकता फाउंडेशनच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. संस्थेचे नाव तात्काळ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर’ करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या १५ आॅगस्टपासून आयटीआय प्रांगणात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसरचे प्राचार्य केतन सोनपीपरे व तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अमित मेश्राम, जिल्हा सोशल मीडियाचे बालचंद बोन्द्रे, सलमान पठाण, सुशांत नागदेवे, रुपेश भंडारे उपस्थित होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून राज्यातील विविध आयटीआयच्या नामांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

यासंदर्भात लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांच्या मागणीची दखल घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (पत्र क्र. ७/ सीटीएस/नामांतरण/२०२६/४०५५, दि. १३ जुलै २०२६) तुमसर आयटीआयचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ करण्याबाबतचा प्रस्ताव अपर मुख्य सचिव यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी सादर केला आहे. तथापि, आवश्यक त्या सर्व प्रशासकीय शिफारसी पूर्ण होऊनही शासन स्तरावर अंतिम निर्णय घेण्यास चालढकल केली जात आहे. स्वराज्य युवा एकता फाउंडेशनकडून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला, परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही शासननिर्णय जारी झालेला नाही. प्रशासकीय विलंबाचा निषेध नोंदवत स्वराज्य युवा एकता फाउंडेशनने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या १४ आॅगस्टपर्यंत नामांतरणाचा अधिकृत शासन निर्णय जारी न झाल्यास १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसरच्या प्रांगणात बेमुदत आमरण उपोषण पुकारले जाईल. उपोषणादरम्यान उद्भवणाºया कोणत्याही प्रसंगाला व बिघडणाºया कायदा- सुव्यवस्थेला शासन आणि प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणात शासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *