भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा पर्व एकाच दिवशी आल्याने गोंदिया शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा येथील प्राचीन शिव मंदिरात सकाळ पासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली रांगा लावल्या. मंदिर परिसरात सकाळपासूनच हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नागरा येथील हे प्राचीन शिव मंदिर सुमारे ५०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष महत्त्व असून गोंदिया जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधूनही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.
श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने यंदा भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. भगवान शंकराच्या पंचमुखी शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा मंदिराच्या बाहेरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंदिराच्या गाभाºयात असलेल्या पंचमुखी शिवपिंडीला हाताने स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा असल्याने गाभाºयातही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी शिवपिंडीवर जल, दूध, बेलपत्र, फुले आणि इतर पूजासाहित्य अर्पण करत मनोभावे पूजा-अर्चना केली. अनेक भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराला साकडे घातले. नागपंचमी असल्याने नागदेवतेचे पूजन करून भगवान शिवाची आराधना करणाºया भाविकांची संख्याही मोठी होती. या मंदिराच्या प्राचीनतेचा उल्लेख गीताप्रेस गोरखपूर येथून प्रकाशित झालेल्या ‘कल्याण’ मासिकाच्या १९५१ सालच्या अंकात आढळत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असल्याचे स्पष्ट होते.
मंदिरातील पंचमुखी शिवपिंड स्वयंभू असल्याची स्थानिक भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचे असून मंदिराला सहा प्रमुख दगडी खांबांचा आधार आहे. या खांबांसह मंदिराच्या दगडी बांधकामावर आकर्षक कोरीव कामही पाहायला मिळते. त्यामुळे धार्मिक श्रद्धेसोबतच हे मंदिर प्राचीन स्थापत्यकलेचा नमुना म्हणूनही भाविकांचे लक्ष वेधून घेते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्याने मंदिर परिसरात विशेष उत्साह पाहायला मिळाला. दूरवरून आलेल्या भाविकांनी पंचमुखी शिवपिंडीचे दर्शन घेत हर हर महादेवचा जयघोष केला. त्यामुळे संपूर्ण नागरा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. श्रद्धा, इतिहास आणि प्राचीन वास्तुकलेचा अनोखा संगम असलेल्या नागरा येथील या शिव मंदिरात श्रावण महिन्यातील पुढील सोमवारीही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.