भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी सण, उत्सव व धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता आणि कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आज शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक नुरुल हसन अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ज्योतिका पिंगळे, सहाय्यक जिल्हाधिकारी साई किरण नंदाला, उपविभागीय अधिकारी विसापूरे, सहायक पोलिस अधिक्षक तेजस सारडा, अतिरिक्त आरोग्य अधिकारी सचिन चव्हाण, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सण-उत्सवांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार अतिरिक्तपोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
संवेदनशील तसेच गर्दीच्या परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणताही संशयास्पद अथवा अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सूचना दिल्या. बैठकीत शांतता समितीच्यासदस्यांनी स्थानिक समस्या व विविध मागण्या मांडल्या. त्यावर पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय व सहकार्यामुळेच शांततापूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगामी सण-उत्सव उत्साहात, शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाचा आनंद सर्वांना घेता यावा, मात्र डीजेचा आवाजामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी. तसेच मिरवणुकीत मद्यपान करून सहभागी होणाºयांवर मंडळांनी स्वत:हून नियंत्रण ठेवावे आणि शिस्तीचा संदेश द्यावा. समाजकंटक व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियमित तपासणी करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहावे तसेच सोशल मीडियावर प्रसारित होणारे व्हिडिओ किंवा संदेश तात्काळ खरे मानू नयेत. काही व्हिडिओ किंवा संदेश गैरसमज निर्माण करण्यासाठी अथवा इतर कारणांसाठी प्रसारित केले जाऊ शकतात. त्यामुळे कोणतीही शंकास्पद घटना किंवा व्हिडिओ निदर्शनास आल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी नागरिकांनी थेट पोलीस किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.