सरांडी/बु.येथील शेतकऱ्यांना गोसेखुर्दचे पाणी ठरले धानासाठी संकट

■ वितरिकांच्या गेट व्यवस्थापनावर शेतकऱ्यांचा सवाल ■ गर्भावस्थेतील धान पिकाला फटका बसण्याची भीती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

दिघोरी मोठी : गोसेखुर्द मुख्य दावा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या वितरणाचे योग्य नियोजन न झाल्याने सरांडी बु. परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. सरांडी बु. येथे गोसेखुर्द मुख्य डावा कालवा येऊन संपतो. याच ठिकाणाहून भागडी पुच्छ वितरिका, मांडळ वितरिका आणि ओपारा वितरिका अशा तीन वितरिकांद्वारे पाण्याचे वितरण होते. मात्र, रविवार दि. २० सप्टेंबर ला प्रत्यक्ष पाहणीदरम्यान भागडी पुच्छ वितरिकेचे गेट बंद, मांडळ वितरिकेला अत्यल्प पाणी, तर मुख्य कालव्याचे बहुतांश पाणी ओपारा वितरिकेकडे जात असल्याचे चित्र दिसून आले. परिणामी ओपारा वितरिकेच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतशिवारात पाणी शिरून अंदाजे १० ते १५ हेक्टर धानशेती बाधित झाल्याचे दिसून आले.

सध्या धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे पिकासाठी नुकसानकारक ठरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही शेतांमध्ये बांधाच्या वरून पाणी वाहत असून, पिकामध्ये मांडी-मांडीपर्यंत पाणी साचल्याचे दिसून आले. आधीच वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि पिकाच्या उत्पादनाबाबतची चिंता असताना आता कालव्याच्या पाणी व्यवस्थापनातील त्रुटीचा फटका बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी मागणी होत आहे. पाणी सोडताना तीन्ही वितरिकांच्या गेटचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याचे संतुलित वितरण करणे तसेच संबंधित गेटकीपरना स्पष्ट सूचना देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात एका वितريكेकडे मोठ्या प्रमाणात पाणी वळल्याने शेतात पाणी घुसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. ‘पाणी शेतासाठी वरदान आहे; मात्र नियोजनाविना सोडलेले पाणी उभ्या पिकासाठी संकट ठरत असेल तर या व्यवस्थाचा शेतकऱ्यांनी फटका का सहन करावा?’ असा संतापत सवालही उपस्थित केला जात आहे.

करीता गोसेखुर्द डावा कालवा प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन तीनही वितरिकांच्या गेटची प्रत्यक्ष तपासणी, पाण्याचे संतुलित वितरण, बाधित शेतांची पाहणी व पंचनामा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

पाणी व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे प्रत्यक्ष नुकसान सिद्ध झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशीही मागणी पुढे आली आहे. आता कालवा प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोणती तातडीची कार्यवाही करते, याकडे सरांडी बु. परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *