सर्व्हिस वायरने घेतला पेट; अर्ध्या सिल्लीत अडीच तास वीजपुरवठा खंडित

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : येथील रहिवासी महादेव फत्तु चोपकर यांच्या घराकडे जाणाºया विजेच्या सर्व्हिस वायरला बुधवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे सर्व्हिस वायरने पेट घेत आगीच्या ज्वाळा थेट घराच्या मीटरपर्यंत पोहोचल्या. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ वीजपुरवठा बंद केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे अर्ध्या सिल्लीत तब्बल अडीच ते तीन तास वीजपुरवठा खंडित राहिला. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव चोपकर यांच्या घराच्या मीटरकडे वीज खांबावरून येणाºया सर्व्हिस वायरमध्ये रात्री अचानक शॉर्टसर्किट झाले. काही क्षणांतच वायरने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा वायरच्या मार्गाने पुढे सरकत थेट घराच्या मीटरपर्यंत पोहोचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वायरमधून ठिणग्या उडत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगत तातडीने वीजपुरवठा बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गावातील वीज हेल्पर भुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत डीपीवरील ग्रीप काढून संबंधित भागाचा वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे वायरमधील वीजप्रवाह थांबविण्यात आला आणि आगीचा धोका कमी झाला. वेळीच वीजपुरवठा बंद करण्यात आला नसता तर आग घरातील इतर भागात तसेच शेजारील घरांपर्यंत पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठा आगडोंब उसळून जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर गावातील नागरिकांना बराच वेळ अंधारात राहावे लागले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. अखेर रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास नवीन फेज टाकण्यात आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे सुमारे अडीच ते तीन तास संपूर्ण गाव अंधारात राहिले.

महावितरणच्या अधिकाºयांवर ग्रामस्थांचा संताप

घटनेनंतर तातडीच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी मानेगाव येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाच ते सहा वेळा फोन करूनही संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होऊन घराच्या सर्व्हिस वायरला आग लागल्यासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही अधिकारी संपर्कात उपलब्ध नसणे ही बाब चिंताजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास किंवा शॉर्टसर्किटसारखी आपत्कालीन घटना घडल्यास नागरिकांना तातडीने महावितरणच्या यंत्रणेशी संपर्क साधता येणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी फोनवर उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी जबाबदारीपासून दूर राहणाºया संबंधित अधिकाºयांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सर्व्हिस वायरची नियमित तपासणी, जीर्ण झालेल्या वायर बदलणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी महावितरणने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशीही मागणी आता जोर धरू लागली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *